top of page

शिकू या भाषा नव्या पद्धतीने !

Updated: May 9, 2021

भाषा हा संपूर्ण शिक्षणाचा पाया आहे . भाषा या विषयात जर तुम्हाला गोडी लागली तर , बाकीच्या विषयांचीही आवड आपोआपच निर्माण होईल . मित्रांनो,तुम्ही जेव्हा शाळेत येता तेव्हा घरूनच एक विशिष्ट भाषा डोक्यात घेऊन आलेले असता . त्या भाषेचं तुमचं जग मर्यादित असतं . (घर , कुटुंब , परिसर , समाज )यांच्या पूरतचं . नुकतच covid-19 या आजाराने सर्वत्र थैमान घातले होते आणि आपल्या शाळा बंद होत्या . परंतु तुमचं हे शिक्षण सुरू होतं ते तंत्रज्ञानाने मोबाईलच्या स्वरूपात साधलेल्या प्रगतीमुळेच आणि आपल्या भाषेच्या संग्रहात तंत्रज्ञानातील अनेक शब्दांची भर पडत गेली . त्या माध्यमातून तुमचं शिक्षणही सुरूच होतं .

आता आपल्या भारतात कोरोना विरुद्ध लढणारी लसीकरणाची सुरुवात देखील झाली आहे आणि तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होता ती म्हणजे शाळा ! शाळा देखील आता तुमच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे . संपूर्ण लॉक डाऊन काळात आपण ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ च्या ,यूट्यूब च्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. परंतु आता तुमचा संबंध प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकाशी येणार आहे . पाठ्यपुस्तकातील धडे,कविता प्रत्यक्ष शिक्षकांच्या माध्यमातून शिकायला मिळणार आहे .तेव्हा मित्रहो धडे कविता ऐकतांना तुम्ही त्यातून काय साध्य करायला पाहिजे ? हे जर तुम्ही लक्षात घेतलं आणि त्या अनुषंगाने वाटचाल केली तर तुमचं भाषा विषय शिकणं ही एक आनंददायी प्रक्रिया होणार आहे .


चला तर मग ,'शिकूया भाषा नव्या पद्धतीने ' !

मित्रांनो मराठी भाषेचा इतिहास , मराठीची खाण ही खूप संपन्न व समृद्ध आहे . भविष्यात तुम्हाला भाषेच्या समृद्धतेचा संपन्नतेचा टप्पा गाठायचा आहे . त्याची सुरुवात ही शालेय जीवनापासूनच करताना पाठ्यपुस्तकातील धडे कविता शिकतांना केवळ वाचन ,पाठांतर , प्रश्नोत्तरे सोडविणे यापुरतेच मर्यादित राहू नये तर मग भाषा अध्ययनाच्या काही टप्प्यातून आपण जाऊ या !

सर्वप्रथम तुमचे निरीक्षण दांडगं असलं पाहिजे .शिक्षकांचे वाचन , उच्चारण ,चढ-उतार , आरोह-अवरोह , विराम चिन्ह यांचा वापर ते कुठे ?कसा ? केव्हा ?करतात याचे सहेतुक निरीक्षण होणे आवश्यक असते . म्हणजेच उत्तम श्रवण हे उत्तम भाषण करण्याची एक पायरी आहे ,हे आपल्या लक्षात येते. श्रवणाचे मूल्यमापन हे तुमच्या प्रकटीकरणावर होत असते. शिक्षकांनी केलेले प्रकट वाचन तुमच्याकडून ही अचूक व्हावे व त्याच पद्धतीने व्हावे ही अपेक्षा असते . आपले श्रवण योग्य होते की नाही यासाठी आपण एक खेळ खेळूया -

1 .सर्वप्रथम तुमचे दोन गट करा .

2.शिक्षक पाठातील उताऱ्याचे वाचन करतील .

3. एका गटाने पाठ्यपुस्तके बंद करून त्यांनी ऐकलेले व आठवणीत राहिलेले पुस्तकातील शब्द सांगावे .

4. शिक्षक ते शब्द फळ्यावर लिहितील .

5. दुसर्‍या गटाने त्याचे वाचन करावे .

6. आता दुसरा गट शब्द सांगेल .

7. पहिल्या गटाने त्या शब्दांचे वाचन करावे .

अशाप्रकारे खेळातील जास्त अचूक व जास्त शब्द सांगणारा गट विजयी होईल.

बघा तर मग तुमच्यात कशी चुरस निर्माण होती ते !

जसे श्रवणाचे तसेच भाषणाचे ही !

भाषण म्हणजे बोलणे . आत्म प्रकटीकरणासाठी आवश्यक असते भाषा व शब्दसंग्रह . मला सुचलेला विचार , मला पडलेला प्रश्न ,माझी कल्पना ,माझे मत व्यक्त करण्यासाठी भाषा ही मैलाचा दगड ठरते .

मग मुलांनो आपण पाठ /कविता शिकत असताना त्यातील आलेले शब्द , चित्र ,नवीन संबोध ,यावर वर्गात मित्रांसोबत चर्चा करतो का ? एखादी घटना आठवून त्यावर बोलतो का ? चला तर मग मी तुम्हाला एक चित्र देते ते म्हणजे झाड !

हिरवे चिमणी

फळ फुल पाने घरटी

फांदी अंडी

१. झाड हिरव्या रंगाचे असते .

२.झाडावर पक्षी घरटे बांधतात .

३. आंब्याच्या झाडाच्या पानांचं तोरण बांधले जाते .

४. फांदीवर झुला बांधतात .

५. आम्ही झाडाची फळे तोडतो.

६. झाडे आपल्याला फुले देतात.

बघा बरं झाडाचे संबंधित कितीतरी शब्द तुमच्या मनात येऊन गेले असतील होय ना ? मग या शब्दांना धरून तुम्हाला वाक्य पूर्ण करता येईल. एका शब्दापासून अनेक वाक्य तयार करता येईल ,अशा प्रकारे शब्दांना धरून अनेक वाक्यांची मनात रचना करून आत्मप्रकटीकरण करणे म्हणजेच बोलणे भाषेतील दुसरे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे भाषण .

मुलांनो शिक्षक तुम्हाला पाठाचे आदर्श वाचन करून दाखवतात त्याप्रमाणे तुम्हाला वाचता यावं हा त्यांचा मूळ उद्देश असतो दिलेला मजकुराचे वाचन सुस्पष्ट, व्यवस्थित व्हावे ,यासाठी तुम्ही काय करावे ? ........ हं..अगदी बरोबर ! तुम्हाला वाचण्याचा सराव करावा लागेल, पण समजपूर्वक असावा जेणेकरून मजकुराचा संदर्भ तुम्हाला कळला पाहिजे ,सांगता यायला पाहिजे. अशा प्रकारे सराव केल्यास बघा मग तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चुटकीसरशी सापडतील की नाही ?

लिहिलेला मजकूर वाचता येणे तसेच वाचलेला मजकूर लिहिता येणे आवश्यक असते . मग तुम्ही हे कौशल्य कसे प्राप्त कराल

सर्वप्रथम तुम्हाला अनुलेखनाचा सराव करावा लागेल. शुद्धलेखनाच्या नियमांचा, विरामचिन्हांचा वापर कुठे आणि कसा करण्यात आलेला आहे याचे निरीक्षण करून लेखनात वापर करता आला पाहिजे. अनु लेखनाचा सराव झाल्यानंतर तुम्हाला शुद्धलेखनाचा ही पुरेसा सराव करून लेखन कौशल्य प्राप्त करता येते.

लेखन कौशल्य हे तुमच्या मनात आलेले विचार, कल्पना ,भावना, मत शब्दबद्ध करून कागदावर उतरविणे यासाठी महत्त्वाचे ठरते .

जसे - १.शब्दावरून वाक्य रचना

२ .तीन शब्द दिल्यास गोष्ट तयार करणे.

३ .प्रसंग लेखन करणे .

४ .कल्पना विस्तार करणे .

५ .चित्र वर्णन करणे इत्यादी.

चला तर मित्रांनो ह्या चार पायऱ्यांचा वापर करून आपण नव्या पद्धतीने भाषा आत्मसात करूया !

3 views0 comments
bottom of page